सध्या सर्वत्र पावसाचे वर्चस्व असलं तरी हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये थोड्याच दिवसात आपल्याला दुलईसह ब्लँकेटची दुकानं ठिकठिकाणी थाटलेली दिसणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय सुरू करायचा विचार करत असल्यास तुमच्यासाठी ही वेळे परफेक्ट ठरणार आहे. कारण, दुलई व ब्लँकेटची विक्री साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून मार्चपर्यंत चालू असते. जर तुम्ही एखादा छोटा किंवा मध्यम व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्यास दुलई-ब्लँकेटचा व्यवसाय तुमच्यासाठी खास ठरू शकतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करता येतो. तसेच, त्यातून तुम्ही चांगला नफा कमवू शकता. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया..
हिवाळा म्हटलं की अंगावर दुलई किंवा ब्लँकेट असलं की लगेच झोप लागते. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या सोईनुसार या गोष्टी त्या बनवून घेतो. तसेच, काहींना रेडिमेड आवडतात. त्याही बाजारात उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही दोन पद्धतीने व्यवसाय सुरू करू शकता. एक थेट डिलरकडून दुलई व ब्लँकेट आणून व्यवसाय थाटू शकता. तसेच, तुम्ही स्वत: चाही एखादा प्लांट टाकू शकता. या दोन्ही पद्धतींसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या आपण जाणून घेऊया.
जर तुम्हाला स्वतः दुलई आणि ब्लँकेट बनवायचे असतील, तर तुम्हाला एक छोटा प्राॅडक्ट प्लांट सुरू करावा लागेल. यासाठी मशीन्स, कच्चा माल आणि पॅकेजिंगची व्यवस्था करावी लागेल. यात जेवढी मेहनत असणार तेवढाच नफा अधिक चांगला मिळणार.
पण, यासाठी अंदाजे ₹50,000 ते ₹1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. यामध्ये मशीन, कापूस (रुई), कापड (फॅब्रिक), लेबलिंग आणि पॅकेजिंगचा खर्च समाविष्ट आहे. तसेच, यासाठी तुम्हाला शिलाई मशीन, रूई भरण्याची मशीन, कच्चा मालात कापूस, कापड, लेबल आणि पॅकेजिंग साहित्य लागणार आहे.
जर तुम्हाला उत्पादनाचे काम करणे शक्य नसेल, तर तुम्ही थेट डीलर किंवा कंपनीकडून तयार माल मागवून विकू शकता. या पद्धतीत सुरुवातीची गुंतवणूक कमी असते. शिवाय व्यवसाय लगेच सुरू करता येतो.
तुम्ही हा व्यवसाय सुरू करायचा विचार करत असल्यास तुम्हाला जास्तीत जास्त ₹10,000 ते ₹20,000 खर्च येऊ शकतो. तुम्ही 20 हजार रुपयांचा माल मागवून तो स्थानिक बाजारपेठेत विकू शकता.
तुमचा बजेट ठरल्यावर तुम्ही दोन्हीपैकी एक व्यवसाय निवडून विक्रीचा आराखडा ठरवू शकता. कारण, आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन विक्रीचा अधिक बोलबाला आहे . यामुळे तुम्ही सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या मदतीने थेट ग्राहकांना विक्री करू शकता. याचबरोबर तुम्ही ऑफलाईन विक्रीही करू शकताय तुम्ही राहत असलेल्या स्थानिक बाजारपेठेत तुमचं दुकान थाटू शकता. तसेच, मॉल्सच्या माध्यमातूनही विक्री करू शकता.
सध्याच्या स्थितीत व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर पैसा अधिक लागतो. मात्र, हा व्यवसाय तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करून सुरू करू शकता. तसेच, हिवाळ्याचा मोसम सुरू असल्यामुळे दुलई व ब्लँकेटची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अल्पावधित तुम्ही अधिक नफा कमवू शकता. याचबरोबर तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोहचण्याचंही टेन्शन राहणार नाही. कारण, ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांतून तुम्ही ग्राहकांपर्यंत सहज पोहोचू शकता.
म्हणून आजच तुमच्या भागातील दुलई व ब्लँकेटच्या गरजेचा आढावा घ्या.. तसेच, योग्य नियोजन करुन व्यवसायाचा आरंभ करा. कारण, हीच वेळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते..