स्कॅम अलर्ट: सणासुदीत खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा..!

स्कॅम अलर्ट: सणासुदीत खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा..!
25 Oct, 2025 View 7311 By Admin

स्कॅम अलर्ट: सणासुदीत खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा..!

सण म्हटलं की खरेदी हे समीकरण संपूर्ण भारतीयांसाठी लागू आहे. मग ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी जोरात खरेदी केली जाते. त्यात आता सरकारने २२ सप्टेंबरपासून जीएसटीत सुधारणा केल्यामुळे कर कमी झाले आहेत. शिवाय नवरात्रीचा आरंभही झाला असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दीच दिसून येत आहे.   मात्र, याच काळात सायबर गुन्हे आणि फिशिंगच्या घटनांमध्येही मोठी वाढ होते. त्यामुळे खरेदीदारांनी काळजी घेणं आवश्यक आहे.. ती कशी घ्यायची हे आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत..

सण म्हटल्यावर आपण खर्चाचा कोणताच हिशोब न ठेवता हवं ते खरेदी करण्यासाठी खूप पैसा खर्च करतो. यामुळे  
स्कॅमर्स सणासुदीच्या सेलचा फायदा घेऊन विविध माध्यमांद्वारे खरेदीदारांना लक्ष्य करतात. यामध्ये मुख्यता बनावट वेबसाईट्स, फिशिंग लिंक्स, फसवे QR कोड आणि खोट्या मेसेजचा वापर ते करतात. शिवाय प्राॅडक्टचे समर्थन करणारे इन्फ्लुएन्सर्स किंवा बनावट ग्राहक सपोर्ट नंबरचे डीपफेक या काळात अधिक सक्रिय होतात. या धोक्याची गंभीरता McAfee Labs च्या जुलै 2025 च्या अहवालात समोर आली होती, ज्यात असे आढळले की त्या वेळी 36,000 पेक्षा जास्त बनावट Amazon साइट्स आणि 75,000 खोटे मेसेज समोर आले होते. यामुळेच खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.. याची लिस्ट खाली दिली आहे..

खरेदीच्या वातावरणात या गोष्टी लक्षात ठेवा..!

  • केवळ अधिकृत वेबसाईट्स किंवा व्हेरिफाइड ॲप्सवरूनच खरेदी करा.
  •  ईमेल, मेसेज किंवा सोशल मीडियावर आलेल्या संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका.
  • पेमेंट करण्यापूर्वी URL आणि सिक्युरिटी सर्टिफिकेट (https://) नक्की तपासा.
  •  जास्त मोठ्या सवलतीच्या ऑफर्सपासून सावध राहा. कारण, अशा ऑफर्स स्कॅमर्सची एक चाल असू शकते.
  •  डिलिव्हरीची माहिती केवळ नोंदणीकृत कंपनीच्या वेबसाईट किंवा ॲपवरूनच मिळवा.
  • *कोणत्याही व्यक्तीसोबत UPI पिन किंवा बँक डिटेल्स शेअर करू नका.
  •  सॉफ्टवेअर वेळोवेळी अपडेट करत रहा आणि मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन (MFA) नेहमी चालू ठेवा.

खालील पद्धतीचा स्कॅमर्स करतात वापर

फिशिंग साइट्स

घोटाळेबाज आर्थिक माहिती मिळवण्यासाठी आकर्षक डील्स देणारे बनावट स्टोअर्स तयार करतात. त्यामुळे फक्त विश्वसनीय स्रोतांचा वापर करा आणि कधीही अनव्हेरिफाइड साइट्सवर क्रेडिट कार्ड नंबर टाकू नका. 

मेलीशियस ग्रीटिंग कार्ड्स

सणासुदीच्या काळात इलेक्ट्रॉनिक ग्रीटिंग कार्ड्स मिळणे सामान्य आहे. पण, काही ई-कार्ड्समध्ये मालवेअर असू शकतो. यामुळे अनोळखी व्यक्तींकडून आलेले किंवा चुकीची माहिती असलेले कार्ड्स लगेच डिलीट करा.

फेक शिपिंग नोटिफिकेशन्स

स्कॅमर्स स्वतःला प्रसिद्ध कुरियर कंपन्यांचे कर्मचारी असल्याचे भासवून ईमेल पाठवतात आणि सांगतात की तुमचे पार्सल आले आहे. हे ईमेल तुम्हाला वैयक्तिक माहिती देण्यासाठी किंवा मालवेअर इन्स्टॉल करण्यासाठी फसविण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे नेहमी डिलिव्हरीची माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईट्सद्वारेच तपासा आणि नको असलेल्या ईमेलच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

सोशल मीडिया फ्रॉड्स

बनावट कॉन्टेस्ट तुम्हाला आॅफर मिळणार यासाठी कूपन किंवा रकमेची लालूच दाखवतात. त्यानंतर तुम्ही त्यात रुची दाखवल्यास तुमची वैयक्तिक माहिती मागतात किंवा डिव्हाइसमध्ये मालवेअर टाकतात. त्यामुळे अधिक आकर्षक वाटाणाऱ्या ऑफर्सपासून सावध राहा.

कामाची गोष्ट

सेल म्हटलं की भारतीयांना खरेदीचे वेध लागतात. त्यामुळे स्कॅमर्स बरोबर मोक्याचे क्षण हेरतात. यामध्ये सणासुदीचे दिवस टाॅपवर आहेत. त्यामुळे खरेदी करताना सजग राहणं आवश्यक आहे. नाहीतर आपलं अकाउंट काहीच सेकंदात खाली होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला असं काही आढळल्यास त्वरित सायबर सेलला तक्रार करा.



अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा संपर्क करा.