सध्या व्यवहार करायचा म्हटलं की, प्रत्येकाची पसंती ऑनलाईनलाच आहे. यामुळे आयुष्य तर सोपं झालं आहे. त्याचबरोबर फसवणुकीचे प्रकार वाढल्याच्या बातम्याही प्रत्येक दिवशी ऐकण्यात-वाचण्यात येत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील ऑनलाईन व्यवहाराला अधिक पसंती देत असल्यास काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहेत. डिजिटल व्यवहाराची सुरुवात थोडी संथ गतीने झाली असं म्हणायला हरकत नाही. मात्र, आता डिजिटल व्यवहाराची वाढलेली संख्या नेत्रदीपक आहे. पीआयबीच्या बातमीनुसार 2024-25 या आर्थिक वर्षात जानेवारीपर्यंत 18120.20 कोटी UPI व्यवहार झाले आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी हा आकडा वाढत आहे. हा आकडा आणखी वाढत राहणार.. म्हणून फसवणूक टाळण्यासाठी तसेच, व्यवहार सहज होण्यासाठी काही गोष्टी प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. अशाच काही निवडक ट्रिक्स तुमच्या कामी येतील.. तुमच्या कष्टाचा पैसा वाचवायला..
व्यवहार करायच्या आधी, संबंधित व्यक्तीचा मोबाईल नंबर किंवा ई-मेल गुगलवर शोधा. कारण, एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर किंवा ई-मेल Google वर शोधला तर त्याबद्दल अनेक माहिती मिळते. जर त्याच व्यक्तीने इतरांनाही फसवले असेल, तर त्याची माहिती तुम्हाला गुगलवर लगेच मिळू शकते. याशिवाय तोच नंबर जर अनेक व्यवसायासाठी रजिस्टर असेल, तर तो स्पष्ट स्कॅम आहे, असं समजायला हरकत नाही.
UPI ची सेवा जरी जलद व सुरक्षित असली, तरी ती फक्त तेव्हाच उपयुक्त असते जेव्हा तुम्ही पैसे योग्य आणि ओळखीच्या व्यक्तीकडे पाठवत असता. UPI चा मुख्य धोका म्हणजे, त्यात समोरच्या व्यक्तीचा तपशील माहिती होत नाही. कारण, ते तुम्हाला QR कोड शेअर करतात. त्यावरून काही माहिती मिळत नाही. कारण, त्यात काही साधे तपशील असतात. म्हणून तुम्ही ज्या व्यक्तीसोबत व्यवहार करणार आहात.
त्याविषयी काही शंका वाटत असेल तर त्या व्यक्तीकडून बँकेचा अकाउंट नंबर, अकाउंट होल्डरचं नाव, बँकेचं नाव व शाखा यासारखी माहिती मागवा. ते प्राप्त झाल्यावर NEFT किंवा IMPS द्वारे पैसे ट्रान्सफर करा. या पद्धतीने तुम्ही व्यवहार केल्यास तुम्हाला खात्याचं नाव, बँकेची शाखा आणि अन्य महत्त्वाची माहिती समजेल. यामुळे काही फसवणूक झाल्यास बॅंकेत तक्रार करायला ही माहिती कामी येते.
आपण व्यवहार करताना जास्त काही शहानिशा करत नाही. थेट रक्कम ट्रान्सफर करतो. मात्र, ज्यावेळी मोठी रक्कम एखाद्याला पाठवायची असल्यास अशा वेळी घाई करू नका. त्या व्यक्तीला थेट फोन करा, त्याच्याशी संवाद करा. थोडा रिसर्च करा मगच रक्कम पाठवायची की नाही हे ठरवा.
आपण बऱ्याचदा काम व्हायच्या आधीच पूर्ण पैसे पाठवून देतो. कारण, पुन्हा पैशासाठी कोणाचा फोन नको अशीच आपली अपेक्षा असते. म्हणून आपण दुसऱ्यांवर अतिविश्वास ठेवून पैसे पाठवून देतो. पण, असे न करता आधी तुम्ही ॲडव्हान्स रक्कम द्या. त्यामुळे पुढची व्यक्ती फसवी असली तर तुम्ही बाकीचे पैसे वाचवू शकता.
फसवणूक करणारे तुम्हाला सर्वाधिक का्ॅल आणि मेसेज करतील. यामध्ये एखाद्या NGO मधून काॅल करत असल्याचा बहाणा ते करू शकतात. तुम्ही थोडा जरी त्यांना प्रतिसाद दिला तर तुम्ही पैसे द्यावं, यासाठी ते तुम्हाला काॅल व मेसेज करून, पैसे द्यायला भाग पाडू शकतात. म्हणून असं काही तुमच्यासोबत होत असल्यास तुम्ही सावध राहा..
आजघडीला संस्था कोणतीही असो आपली सेवा अनेकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सक्रीय असतात. यामध्ये वेबसाईट, फेसबुक पेज, इंस्टाग्राम किंवा अन्य सोशल मीडिया पेजचाही समावेश असतो. तिथे त्यांचा फोन नंबर, पत्ता आणि ग्राहकांचे रिव्ह्यू असतात. शिवाय त्यांचा व्यवसाय काय याची माहितीही नमूद केलेली असते. त्यामुळे व्यवहार करण्याआधी तुम्ही ऑनलाइन चेक करू शकता. यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होते. आता तुम्ही म्हणालं हे तर कोणताही स्कॅमर करू शकतो. मात्र, तरीही पहिल्यांदा हे चेक करणं सोपं होऊ शकतं.
तुम्हाला ज्या नंबरवर व्यवहार करायचा आहे. तो आधी Truecaller अॅपवर टाकून शोधा. जर तो नंबर आधी कोणीही फसवणुकीसाठी वापरला असेल, तर लोकांनी त्याला "Fraud", "Scam", "Spam" अशी टॅग लावलेली असेल. यावरून तुम्ही ज्याच्यासोबत व्यवहार करणार आहात त्याच्याविषयी तुम्हाला अंदाजा लागू शकतो.
आता पैसे पाठवायच्या आधी आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे. याविषयी सर्व गोष्टी सविस्तर जाणून घेतल्या आहेत. त्या तुम्हाला समजल्या असतील अशी अपेक्षा आहे. तरीही एखाद्या व्यक्तीने तुम्हाला ओटीपी किंवा पिन मागितल्यास तो देऊ नका. कारण, तुम्ही तो दिल्यास तुमचं खातं रिकामं होऊ शकतं. तुमच्या सोबत असं काही घडलं असल्यास लगेच सायबर सेलला तक्रार करा..