Investment Guru : गुंतवणूक करायचा विचार करताय?? मग वॉरेन बफेच्या या ५ गोष्टी कायम ठेव लक्षात

Investment Guru : गुंतवणूक करायचा विचार करताय?? मग वॉरेन बफेच्या या ५ गोष्टी कायम ठेव लक्षात
25 Nov, 2025 View 71046 By Admin

Investment Guru : गुंतवणूक करायचा विचार करताय?? मग वॉरेन बफेच्या या ५ गोष्टी कायम ठेव लक्षात

गुंतवणूक म्हटलं की विचार आलाच. कारण, एक चूक आपली मेहनत शून्य करू शकते. म्हणूनच आज जगातील दिग्गज गुंतवणुकदारांपैकी एक असलेल्या वॉरेन बफे यांच्या गुंतवणुकीच्या धोरणाविषयी आपण जाणून घेणार आहोत. शेअर मार्केटच्या दुनियेत त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतले जाते.. तसेच, त्यांनी आपल्या विचारसरणीने जगभरातील कोट्यवधी गुंतवणूकदारांना प्रेरित केले आहे. त्यांचे विचार नवीन गुंतवणुकदारांना मोठी शिकवण ठरू शकते. त्यामुळे तुम्हीही शेअर बाजारात नवीन असल्यास गुंतवणुकी संदर्भात असलेल्या या 5 टिप्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात..

1. ज्या व्यवसायाची माहिती असेल, त्याच ठिकाणी गुंतवणूक करा

आजघडीला प्रत्येक जण झटपट श्रीमंत होऊ इच्छित आहे. त्यामुळे एखाद्याचा सल्ला ऐकूण आपण सर्व मेहनत शून्य करू शकतो. म्हणून बफे यांनी गुंतवणुकीचा सांगितलेला फंडा एकदम साधा आहे की, ज्या कंपनीच्या व्यवसायाबद्दल तुम्हाला माहिती आहे, त्याच कंपनीत गुंतवणूक करा. गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचा व्यवसाय मॉडेल, नफा, कर्ज आणि भविष्यातील वाढीच्या शक्यता समजून घ्या. जर कंपनी येत्या काही वर्षांत चांगली कामगिरी करेल असे वाटत असेल, तरच त्यात पैसे लावा. लक्षात ठेवा, स्वस्त शेअर नेहमी चांगला नसतो, पण चांगल्या कंपनीचा स्वस्त शेअर सोन्याहून अधिक मौल्यवान सिद्ध होऊ शकतो.

2. शाॅर्ट  टर्म नाही, लाॅंग टर्मचा विचार करा

मार्केटमध्ये कधी काय होईल हे कोणालाच सांगता येणार नाही. कारण, मार्केट हे अनिश्चिततेने भरलेले आहे. त्यामुळे मार्केट जेवढ्या वेगाने फायदा देऊ शकतो, तेवढ्याच वेगाने नुकसानही करू शकतो. म्हणून बफे म्हणतात, मार्केटमधून मोठा नफा कमवायचा असेल, तर गुंतवणूक नेहमी दीर्घकाळासाठी करावी.

3. जेव्हा दुसऱ्यांना भीती वाटेल, तेव्हा तुम्ही संधी शोधा

बफे यांचा हा फॉर्म्यूला सर्वात हिट आहे की, जेव्हा दुसरे लोक लालची होतात, तेव्हा तुम्ही घाबरा आणि जेव्हा दुसरे घाबरतात, तेव्हा तुम्ही लालची बना. याचा अर्थ असा आहे की, जेव्हा बाजारात घसरण होते आणि लोक घाबरून शेअर्स विकू लागतात, तीच खरी गुंतवणुकीची वेळ असते. २००८ च्या मंदीमध्ये जेव्हा संपूर्ण बाजार कोसळत होता, तेव्हा बफे यांनी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आणि त्याच गुंतवणुकीतून त्यांना पुढे अब्जावधींचा नफा मिळाला.

4. पोर्टफोलिओचे डायव्हर्सिफिकेशन आवश्यक आहे

बफे म्हणतात की, “कधीही सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नका.” गुंतवणूक नेहमी बॅलन्स असायला हवी. काही हिस्सा इक्विटीमध्ये (शेअर मार्केट), काही सोन्यात, काही रियल इस्टेटमध्ये आणि काही निश्चित परतावा देणाऱ्या योजनांमध्ये (FD, बॉन्ड्स इत्यादी) गुंतवा. जर एखाद्या सेक्टरमध्ये नुकसान झाले, तर दुसरा सेक्टर त्याची भरपाई करेल. डायव्हर्सिफिकेशन पोर्टफोलिओ केवळ धोका कमी करत नाही, तर परतावा देखील स्थिर ठेवतो.

5. झेपवेल तेवढीच रिस्क घ्या..!

वॉरेन बफे यांनी दिलेल्या “Risk comes from not knowing what you're doing.” या मंत्राचा प्रत्येकाने जप करणं आवश्यक आहे. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, जेव्हा आपल्याला काय करत आहोत, हेच माहित नसतं तेव्हा धोका अधिक असतो. तसेच, शेअर बाजार धोकादायक आहे, म्हणूनच तेवढेच पैसे गुंतवा जेवढे गमावल्यानंतरही तुम्हाला शांत झोप लागेल. ते म्हणतात, जर तुम्ही नदीची खोली दोन्ही पायांनी मोजायला गेलात, तर बुडू शकता. 

त्यापेक्षा एका हाताने किनारा घट्ट पकडा, एका पायावर चांगले बॅलन्स बनवा आणि मग दुसर पाय पाण्यात टाकून खोलीचा अंदाज घ्या. यामुळे तुम्ही बुडण्यापासून वाचू शकता. म्हणून, आधी छोट्या गुंतवणुकीने सुरुवात करा, मार्केटची समज वाढवा, आणि मग हळूहळू मोठी रिस्क घ्या..



अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा संपर्क करा.