पूर्वी डिजिटल व्यवहार म्हटलं की, अनेकांना नको वाटायचं. मात्र, कोरोनानंतर देशात डिजिटल व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे. आता लोक सर्वाधिक व्यवहार यूपीआय, डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारेच करत आहेत. तरीही, आजसुद्धा अनेक लोकांना रोख व्यवहारच अधिक सोयीचा वाटतो. त्यामुळे लोक बऱ्याचदा मोठी रक्कम काढून घरी ठेवतात. पण, घरात रोख रक्कम ठेवायलाही इन्कम टॅक्सचे काही नियम आहेत. त्याचं उल्लंघन केलं तर दंड भरावा लागू शकतो. तुम्हाला याविषयी माहिती आहे का?? चला सविस्तर जाणून घेऊया..
इन्कम टॅक्स विभागाने टाकली धाड, इतकी रक्कम केली जमा.. अशा आशयाची बातमी तुम्ही एकदा तरी वाचली किंवा ऐकली असेल. तर इन्कम टॅक्सने पैशासाठी वेगवेगळे नियम बनवले आहेत. कारण, यामुळे भ्रष्टाचार आणि फसवणुकीला आळा घालण्यास मदत होते. तसेच, ते तपासण्यासाठी तुम्ही एखादी रक्कम कोणाला ट्रान्सफर केली, त्या रकमेने मर्यादा ओलांडली असल्यास तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीसही येऊ शकते. असं केल्याने व्यवहारात पारदर्शकता राहते. त्यामुळे घरात रोख रक्कम ठेवायलाही काही मर्यादा आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडतो.
इनकम टॅक्सच्या नियमांनुसार, तुम्ही घरात हवी तितकी रोख रक्कम ठेवू शकता. यावर थेट कोणतीही मर्यादा नाही. पण, तपास यंत्रणांनी ही रक्कम पकडली, तर तुम्हाला त्या पैशाचा योग्य स्रोत सांगावा लागतो. पैसा वैध मार्गाने कमावलेला असेल आणि त्याची योग्य कागदपत्रं तुमच्याकडे असतील, तर घाबरण्याचं काहीच कारण नाही. तसेच, जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असाल आणि त्यात सर्व व्यवहार नमूद केले असतील, तर कुठल्याही चौकशीची भीती बाळगण्याची गरज नाही.
तुमच्याकडे खूप पैसा आहे. मात्र, त्याचा स्रोत तुमच्याकडे नाही तर ती रक्कम अघोषित उत्पन्न (Undisclosed Income) मानली जाते. अशा रकमेवर 78% पर्यंत कर आणि दंड भरावा लागू शकतो. म्हणूनच, जेव्हा तुम्हाला कोणतीही रक्कम मिळते किंवा तुम्ही कोणाला पैसे देता. तेव्हा त्याचा योग्य पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे.
जर तुम्ही व्यापारी किंवा छोटे-मोठे व्यावसायिक असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जसे की तुमची कॅशबुक तुमच्या अकाउंटसह जुळणं आवश्यक आहे. तसेच, तुम्ही व्यापारी किंवा व्यावसायिक नसाल तरीही तुम्हाला पैशांचा स्त्रोत दाखवणं बंधनकारक आहे. नाहीतर तुम्हाला शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. म्हणून तुमचा पैसा मेहनतीचा असेल तर तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. कारण, तुमच्याकडे त्या पैशांचा पूर्ण हिशोब असणार आहे..
आपल्या पैशांवर इन्कम टॅक्सची कडक नजर असते. ते एका अर्थाने गरजेचं आहे. कारण, भ्रष्टाचार किंवा फसवणुकीला यामुळे सहज रोखता येते. त्यामुळे एक सजग नागरिक बनून, मेहनतीने पैसे कमावताना पैशाचा हिशोब आणि तो कुठून आला याचा पुरावा जवळ असणं गरजेचं आहे..