आजच्या धावपळीच्या युगात फक्त पैसे कमवणे पुरेसे नाही, तर ते पैसे टिकवणे आणि वाढवणे जास्त महत्त्वाचे आहे. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 'मोठं उत्पन्न' असण्यापेक्षा 'चांगल्या आर्थिक सवयी' असणे जास्त गरजेचे असते. जर तुम्हालाही तुमच्या पैशांवर नियंत्रण मिळवायचे असेल, तर खालील ५ गोष्टी फॉलो करा.
१. बजेट बनवण्याची सवय लावा
आर्थिक शिस्तीची पहिली पायरी म्हणजे बजेट. तुमच्याकडे किती पैसे येतात आणि कुठे खर्च होतात, याचा हिशोब असणे आवश्यक आहे. ५०/३०/२० नियमाचा वापर केल्यास आपली बचत होण्यास मदत होईल. शिवाय खर्च आटोक्यात येऊन, जिकडे गरज असेल तिकडेच खर्च होईल. आपण खालील पद्धतीने त्याचं अनुकरण करू शकता..
५०%: गरजांवर खर्च करा (भाडे, किराणा, बिले).
३०%: इच्छा (फिरणे, बाहेरचे जेवण, छंद).
२०%: बचत आणि गुंतवणूक.
२. आधी बचत मग..
बहुतेकांची बचतीची पद्धत एकच आहे आधी खर्च करायचा, उरलेली रक्कम बचत करायची. मात्र, ही पद्धत चुकीची आहे. कारण, आधीच खर्च केल्यावर तुम्ही बचत काय करणार? म्हणून पगार झाल्यावर सर्वांत आधी ठरवलेली बचतीची रक्कम बाजूला काढा आणि उरलेल्या पैशात महिना चालवा. यामुळे तुमची मोठी बचत व्हायला मदत होईल..
योग्य पद्धत: उत्पन्न - बचत = खर्च.
कमाईतला मोठा भाग बचत केल्यास, तुम्ही आयुष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करू शकता..
३. आपत्कालीन निधी तयार करा
आयुष्यात संकट कधी येईल सांगता येत नाही. अचानक आलेला वैद्यकीय खर्च किंवा नोकरी जाणे यासारख्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे 'इमर्जन्सी फंड' असायला हवा. ६ महिन्यांचा खर्च तुम्ही घरी बसून असला तरी भागला पाहिजे, एवढी रक्कम इमर्जन्सी फंडात असणं आवश्यक आहे.
४. अनावश्यक कर्जापासून लांब राहा
क्रेडिट कार्डचा अतिवापर आणि विनाकारण घेतलेले वैयक्तिक कर्ज तुमच्या आर्थिक प्रगतीला खिळ घालतात. म्हणून गरज असेल तेव्हाच कर्ज घ्या. तसेच, तुमचे क्रेडिट कार्ड बिल दर महिन्याला वेळेवर भरा जेणेकरून चक्रवाढ व्याजाच्या जाळ्यात तुम्ही अडकणार नाही.
५. लवकर गुंतवणूक सुरू करा
फक्त बचत करून तुम्ही महागाईला हरवू शकत नाही. त्यासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. सध्या प्रचलित असलेल्या SIP (Systematic Investment Plan) द्वारे दरमहा ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवा. यामुळे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळेल.. यासाठी तुम्हाला लवकर गुंतवणूक करणं गरजेचं असतं.
महत्त्वाच्या टिप्स:
१. खर्चाची नोंद ठेवा: प्रत्येक छोट्या-मोठ्या खर्चाची नोंद करण्यासाठी मोबाईल अॅप्सचा वापर करा.
२. गरज आणि इच्छा यातील फरक ओळखा: एखादी गोष्ट घेण्यापूर्वी स्वतःला विचारा, "मला याची खरोखर गरज आहे की ही फक्त माझी इच्छा आहे?"
३. आर्थिक साक्षरता वाढवा: पैसे आणि गुंतवणुकीबद्दल पुस्तके वाचा किंवा तज्ज्ञांचे सल्ले घ्या.
कामाची गोष्ट
आर्थिक सवयी एका दिवसात बदलत नाहीत. त्यासाठी सातत्य आणि संयम हवा. आज घेतलेला छोटासा निर्णय तुमच्या भविष्यातील मोठ्या आर्थिक संकटांना रोखू शकतो. तुम्ही वरील गोष्टींप्रमाणे तुमच्या आयुष्याची आर्थिक घडी बसवल्यास तुम्हाला कोणा पुढेही हात पसरावा लागणार नाही..
अस्वीकरण : या लेखातील माहिती व गुंतवणुकीसंदर्भातील मते ही फक्त माहितीपर उद्देशाने असून, कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.