आधी कागदपत्रं ठेवायचं म्हटलं की, संदूक किंवा लोखंडी व लाकडी पेट्यांचा वापर अधिक व्हायचा. मात्र, कालांतराने गोष्टी बदलत गेल्यात. पुढे त्यांची जागा कपाटाने घेतली. मात्र, आजच्या काळात महत्त्वाच्या कागदपत्रांची सुरक्षितता हा प्रत्येकासाठी चिंतेचा विषय बनला आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, मालमत्तेची कागदपत्रे, विमा पॉलिसी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे यासारखी महत्त्वाची कागदपत्रे हरवली किंवा चोरीला गेली तर मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की, कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी डिजिटल लॉकर अधिक चांगला की बँक लॉकर?
भारत सरकारने सुरू केलेला डिजिलॉकर (DigiLocker) हा एक क्लाउड-आधारित प्लॅटफॉर्म आहे, जिथे नागरिक आपली महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवू शकतात. आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि विमा पॉलिसी यासारखी कागदपत्रे येथे जतन करता येतात. याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे ही कागदपत्रे हरवत नाहीत आणि आग, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचाही त्यांच्यावर परिणाम होत नाही. शिवाय, ही कागदपत्रे कधीही आणि कुठूनही सहजपणे पाहता आणि वापरता येतात. मात्र, पासवर्ड विसरून जाणं किंवा सायबर सुरक्षेशी संबंधित काही धोकेही लक्षात घेणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, बँक लॉकर हा पारंपरिक आणि विश्वासार्ह पर्याय मानला जातो. यात दागिने, रोख रक्कम, मालमत्तेची मूळ कागदपत्रे आणि इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवता येतात. बँक लॉकरमध्ये आजकाल बायोमेट्रिक पडताळणी आणि CCTV निगराणी यांसारख्या आधुनिक सुरक्षा प्रणालींचा वापर केला जात आहे. मात्र, लॉकर वापरण्यासाठी बँकेत जावे लागते आणि त्यासाठी ठराविक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तसेच, त्याचे वार्षिक भाडेही भरावे लागते.
तज्ज्ञांच्या मते, दोन्ही पर्यायांची स्वतःची वैशिष्ट्ये आणि मर्यादा आहेत. डिजिटल लॉकर कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्वरित वापरासाठी उपयुक्त आहे, तर बँक लॉकर मूळ कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक विश्वासार्ह मानला जातो.
आजच्या डिजिटल युगात योग्य मार्ग म्हणजे दोन्ही पर्यायांचा संतुलित वापर करणे. डिजिटल लॉकरमध्ये कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी ठेवाव्यात आणि बँक लॉकरमध्ये त्यांच्या मूळ प्रती सुरक्षित ठेवाव्यात. अशा प्रकारे आपण आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रांची आणि मौल्यवान वस्तूंची सर्व प्रकारच्या धोक्यांपासून योग्य प्रकारे सुरक्षा करू शकतो..
कामाची गोष्ट
कागदपत्रं सर्वांत महत्वाची असतात.. कारण, कुठेही आपण गेलो तरी ओळखीचा पुरावा हा मागितला जातोच. हा कुणाही जवळ सहज उपलब्ध असतो. पण, हाही कागदपत्रात येतो. असेच बरेच महत्वाचे कागदपत्रं आहेत. जे आपण घेऊन फिरू शकत नाही. मात्र, त्यांच्याशिवाय आपलं काम होऊ शकत नाही.. त्यामुळे त्याचं महत्व तुम्हाला कळलं असेल.. शिवाय तुम्ही वर दिलेल्या गोष्टी करणार, यात तिळमात्र शंका नाही..