Investment Tips: गुंतवणुकीत फक्त तोटा होत आहे? मग कियोसाकी यांचा 'हा' फॉर्म्यूला अप्लाय करा..!

Investment Tips: गुंतवणुकीत फक्त तोटा होत आहे? मग कियोसाकी यांचा 'हा' फॉर्म्यूला अप्लाय करा..!
18 May, 2026 18 Views By Admin

Investment Tips: गुंतवणुकीत फक्त तोटा होत आहे? मग कियोसाकी यांचा 'हा' फॉर्म्यूला अप्लाय करा..!

गुंतवणुकीच्या जगात सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या पुस्तकांपैकी एक म्हणजे रिच डॅड पुअर डॅड (Rich Dad Poor Dad). या पुस्तकाने लाखो लोकांचा पैशाकडे आणि गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला. या पुस्तकाचे लेखक राॅबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) हे त्यांच्या आर्थिक भाकितांमुळे आणि स्पष्ट मतांमुळे कायम चर्चेत असतात. ते नेहमी सांगतात की यशस्वी गुंतवणुकीचा पाया हा आर्थिक शिक्षणात असतो.

अनेक आर्थिक तज्ज्ञ पैसे कसे कमवायचे? हे सांगतात. पण कियोसाकी यांची खासियत म्हणजे ते पैसे कसे गमावले जातात? हेही स्पष्टपणे समजावून सांगतात.

गुंतवणुकीत लोक सर्वांत मोठी चूक कुठे करतात?

कियोसाकी यांनी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये महत्त्वाचा सल्ला दिला होता, त्यात ते म्हणाले होते की,  ज्या गोष्टीची पूर्ण माहिती नाही, त्यात गुंतवणूक करू नका. त्यांच्या मते, अनेक मध्यमवर्गीय आणि सामान्य गुंतवणूकदार हॉट टिप्सच्या मागे धावत असतात. कुणीतरी सांगितलं, सोशल मीडियावर ट्रेंड दिसला किंवा एखाद्या न्यूजमध्ये एखादा शेअर चर्चेत आला की, लगेच त्यात पैसे टाकले जातात. पण त्या कंपनीचा व्यवसाय, भविष्यातील क्षमता किंवा जोखीम समजून घेण्याचा प्रयत्न अनेकदा केला जात नाही. अशा प्रकारची गुंतवणूक म्हणजे कियोसाकी यांच्या भाषेत ती गुंतवणूक नाही, तर जुगार आहे.

मग श्रीमंत लोक वेगळं काय करतात?

कियोसाकी यांच्या मते, श्रीमंत लोक सर्वांत आधी स्वतःच्या ज्ञानात गुंतवणूक करतात. ते बाजार समजून घेतात, विविध गुंतवणूक पर्यायांचा अभ्यास करतात आणि मग निर्णय घेतात. त्यामुळे त्यांचे निर्णय अधिक विचारपूर्वक आणि दीर्घकालीन फायदेशीर ठरतात. त्यांचा स्पष्ट संदेश आहे आधी शिका… मग गुंतवणूक करा.

नशिबावर नाही, तर ज्ञानावर विश्वास

कियोसाकी यांना लक किंवा नशिबावर फारसा विश्वास नाही. त्यांच्यानुसार आर्थिक यश हे योग्य माहिती, रणनीती आणि शिस्तबद्ध निर्णयांमुळे मिळते. त्यांचे रिच डॅड हे पुस्तक याच विचारांचा वेध घेते. ते म्हणातात की, गुंतवणुकदारांना त्याच अॅसेटवर लक्ष द्यायला पाहिजे, जे त्यांना अधिक आवडतात. उदा.  तुम्हाला जर शेअर बाजार आवडत असेल, तर त्या क्षेत्राचा सखोल अभ्यास करा. म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तरी आधी त्यामागची कार्यपद्धती समजून घेणं गरजेचं आहे.

कियोसाकी यांच्या मतात किती तथ्य आहे?

कियोसाकी यांचा इशारा आजच्या वास्तवाशी अगदी जुळणारा आहे. अनेक लोक कोणतीही पूर्ण माहिती न घेता थेट शेअर बाजारात गुंतवणूक करतात. मित्रांकडून, सोशल मीडियावरून किंवा एखाद्या न्यूजमधून एखाद्या शेअरबद्दल ऐकलं की लगेच त्यात पैसे गुंतवले जातात. पण त्या कंपनीचा अभ्यास, तिची आर्थिक स्थिती किंवा तो शेअर आपल्या गुंतवणुकीच्या पद्धतीला योग्य आहे का, याचा अनेकदा विचारच केला जात नाही.

उदा. तुम्हाला कमी कालावधीत नफा कमवायचा असतो; पण कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही असा शेअर खरेदी करता. जो दीर्घकालीन गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतो. मात्र सुरुवातीच्या काही महिन्यांत ३० ते ४० टक्क्यांनी खाली येतो. कियोसाकी यांच्या मते, अशी गुंतवणूक म्हणजे जुगारासारखी असते आणि त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. एका अभ्यासानुसार, सुमारे ६६ टक्के गुंतवणूकदार भावनेच्या भरात निर्णय घेतात आणि नंतर त्याबद्दल पश्चात्ताप करतात.

गुंतवणूकदार कोणत्या चुका करतात?

चर्चेत असलेल्या शेअर्सच्या मागे धावणे : एखाद्या कंपनीची चर्चा सुरू आहे म्हणून तिच्या फंडामेंटलकडे लक्ष न देता त्यात गुंतवणूक करणे.

चुकीच्या सल्ल्यावर विश्वास ठेवणे : मित्र, नातेवाईक किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांच्या सांगण्यावरून कोणताही अभ्यास न करता पैसे गुंतवणे.

अतिरिक्त डायव्हर्सिफिकेशन करणे : स्पष्ट रणनीती नसताना खूप ठिकाणी गुंतवणूक करणे. त्यामुळे मोठा नफा मिळण्याची शक्यता कमी होते.

कियोसाकी यांच्या म्हणण्याचा अर्थ अगदी सोपा आहे, आधी माहिती मिळवा आणि मगच गुंतवणूक करा. बाजार समजून घेणे आणि स्पष्ट गुंतवणूक रणनीती तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे भविष्यात महागात पडणाऱ्या चुका टाळता येतात. जसे कियोसाकी म्हणतात, आधी शिका… मग गुंतवणूक करा. कारण श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होण्यामागे हेच सर्वात मोठं गुपित आहे.



अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा संपर्क करा.