IWD2026: गुंतवणुकीचे हे ‘7’ पर्याय महिलांची बचत करणार मजबूत..

IWD2026:  गुंतवणुकीचे हे ‘7’ पर्याय महिलांची बचत करणार मजबूत..
23 Mar, 2026 37 Views By Admin

IWD2026: गुंतवणुकीचे हे ‘7’ पर्याय महिलांची बचत करणार मजबूत..


  

महिलांना बचत कशी करायची हे सांगण्याची गरज नाही. मात्र, कुठे करायची याविषयी थोडी माहिती असणं आवश्यक आहे. यामुळे बचत सुरक्षित राहून रिटर्न अधिक मिळण्याची शक्यता वाढते.. म्हणून महिला दिनाच्या खास पर्वावर तज्ज्ञांनी ७ गुंतवणूक योजनांची शिफारस केली आहे, ज्या केवळ चांगला परतावा देत नाहीत तर कर बचतीचीही संधी देतात. या पर्यायांमध्ये तुलनेने कमी जोखीम असून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. विशेषतः कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःची बचत मजबूत करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी हे पर्याय फायदेशीर ठरणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया.. 
  
1. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) 

SIP हा छोट्या-छोट्या रकमेपासून मोठा निधी तयार करण्याचा प्रभावी मार्ग आहे. हा शिस्तबद्ध गुंतवणुकीचा प्रकार असून दीर्घकालीन काळात इक्विटी बाजारातून चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते. यामध्ये विशेष म्हणजे महिला त्यांच्या उत्पन्नानुसार कमी रकमेपासून सुरुवात करून नंतर गुंतवणूक वाढवू शकतात. यामुळे त्यांना मार्केटमध्ये कुठे गुंतवणूक करायची, याची समज वाढायला मदत होईल. 

2. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) 

PPF हा महिलांसाठी सर्वांत सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक पर्यायांपैकी एक मानला जातो. यात १५ वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो, मात्र काही अटींसह मधल्या काळात थोडी रक्कम काढण्याची सुविधा असते. कर सवलत आणि निश्चित व्याजदर यामुळे सुरक्षित गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी हा छान पर्याय आहे. 

3. नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) 

NPS महिलांना रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्नाची हमी देणारी योजना आहे. यात गुंतवणूक केल्यास आयकर कायद्यातील सेक्शन 80C आणि 80CCD अंतर्गत कर सवलत मिळते. त्यामुळे भविष्यात पेन्शन मिळवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही योजना उपयुक्त आहे. 

4. सोन्यातील गुंतवणूक 

सोन्याची गुंतवणूक ही पारंपरिकरित्या महिलांची पसंतीची गुंतवणूक आहे. मात्र, आता गोल्ड ETF आणि डिजिटल गोल्ड यांसारखे आधुनिक पर्यायही उपलब्ध झाले आहेत. महागाई किंवा आर्थिक अस्थिरतेच्या काळात सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. 

5. इक्विटी गुंतवणूक 

इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परताव्याची शक्यता असते. यात जोखीम असली तरी करिअरमध्ये प्रगती करत असलेल्या आणि काही प्रमाणात जोखीम घेण्यास तयार असलेल्या महिलांसाठी दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा हा प्रभावी मार्ग ठरू शकतो. 

6. फिक्स्ड डिपॉझिट (FD) 

FD हा सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारा गुंतवणूक पर्याय आहे. अनेक बँका महिलांसाठी FD वर अतिरिक्त व्याजदर देतात. त्यामुळे जोखीम टाळू इच्छिणाऱ्या महिलांसाठी हा योग्य पर्याय ठरतो. 

7. रिअल इस्टेट गुंतवणूक 

मालमत्तेमध्ये गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन चांगला परतावा मिळू शकतो. त्याचबरोबर मालमत्तेची मालकी महिलांना आर्थिक तसेच सामाजिक सुरक्षितता देखील प्रदान करते. 

कामाची गोष्ट 

गुंतवणूक अशी गोष्ट आहे, जे आपल्याला कोणत्याही आर्थिक संकटातून बाहेर काढू शकते. त्यामुळे आपल्या उत्पन्नानुसार आजच गुंतवणुकीला आरंभ करा. पण, त्याआधी थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे. ते शक्य नसल्यास गुंतवणुकीसाठी आर्थिक सल्लागार नियुक्त करणंही फायद्याचं ठरू शकते..



अधिक माहितीसाठी शाखेला भेट द्या किंवा संपर्क करा.